काही गोष्टी अथवा अनुभव खुल्या दिलाने आणि मोजक्या शब्दात व्यक्त करणं जरा अवघड असतं. त्यातली एक म्हणजे आपल्या पालकांची विदेश वारी! तरी काही ठळक आठवणींचा आधार घेऊन सुरू करतो, बाप्पा मोरया...

मे चा महिना म्हणजे मुंबईत नरक आणि अमेरिकेत वर्ग! त्यामुळे घरची समिती बोलवून आम्ही मागल्या वर्षीच तिकिटे काढून मोकळे झालो होतो. आता या सिंदाबादच्या मोठ्या सफरीमध्ये पहिला पडाव असतो १२ तासांच्या विमानाचा. ते ऐकून आधीच हालत अशी होती की "तौबा तौबा सारा मूड खराब". त्यातून आमच्या पिताजींनी तर देशाबाहेर पर्यटनही केले नव्हते, त्यामुळे जायीस्तोवर नुसते तणावग्रस्त वातावरण! मग तिकडे देव आठवून, आईचा हात पकडून आणि अरबी (emirates) घोड्यांवर भरोसा ठेवून पालखी एकदाची शिकागोच्या बंदरात पोहोचली.

शिकागो एअरपोर्टवर त्यांना पाहताच मनात भावनांचा कल्लोळ उठला. त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा आणि उत्सुकतेचे मिश्रण पाहून मला माझ्या बालपणीच्या पहिल्या सहलीची आठवण झाली. आणि येथे मी पहिल्यांदा, विथ लायसेंस, २ तासांची ड्राईव्ह करत सरस ट्रॅफिकमधून एअरपोर्टला पोचलो होतो. आयुष्यात असे पहिल्यांदाच होते जेव्हा त्यांना पुढचा रस्ता माहित नाही, आणि तो दाखवायची जबाबदारी माझी होती! लांबलचक प्रवासानंतरचे ते चित्र आणि क्षण डोळ्यात साठवत त्यांना घरी नेण्यासाठी सज्ज झालो.

शिकागोतून आमच्या घरचा प्रवास म्हणजे, शहरातून गावात जाण्याची सफर असते. बघता बघता टोलेजंग इमारती मागे जातात आणि अमेरिकेबद्दलची कल्पनाशक्ती सुद्धा लोप पावते! त्या बाबांनी पहिल्यांदाच स्कायस्क्रेपर पाहिले तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द निघाले, "आपल्या मुंबईच्या इमारती टिचभर वाटतील!" आहे आमचे गाव सुंदरच, पवनचक्क्या दिसू लागल्या की समजायचं, चांद आलं जवळ! प्रवासवर्णन ऐकत आणि जेटचा लॅग काढत आम्ही सोसायटीमध्ये पोहोचलो. तयार जेवणाने "पाहुण्यांचे" स्वागत करून मग आम्ही फ्लॅटचे "घर" केले!

दुपारी वामकुक्षीच्या नावाने दोघे जे झोपले ते उठता उठेना! परत ही पहिलीच वेळ जेव्हा हा पडदा उलटा फिरला होता आणि त्यांना जागं ठेवायची अपेक्षा माझ्याकडून होती. पुढचे अनेक दिवस अनेक ठिकाणी फिरलो, सोबत कैक मैल प्रवास केला. इथल्या शांततेची त्यांना पटकन सवय झाली. माझ्या इथल्या मित्र-परिवाराशी त्यांची गाठभेट पाहताना मला अगदी मार्वलचे २ युनिव्हर्स भिडताना चा भास झाला!

अमेरिकेतील जीवन पाहून त्यांना हे जाणवलं की इथे लोकांकडे वेळ खूप आहे. भारतातील २४ तास जरा कमीच पडतात, का कोण जाणे! गावात अगदी जोडगोळी रिटायर्ड लाईफच्या थीममध्ये खुश होती. त्याचं एक प्रमाण पत्र म्हणजे चक्क आईने एक महिना एकदाही Zee मराठीचा हट्ट केला नाही! हे म्हणजे जणू सूर्य पश्चिमेला उगवल्यासारखंच! मावस भावंडांसोबत आमच्या घरी निवांत रविवार घालवताना ३ वर्षात पहिल्यांदा परदेशी असल्याचं विसर पडला.

शेवटी वेळेचं काय, ठरल��लं असतं. चांगलं असलं तर कसल्या वेगाने जातो! तसा महिना साधारण तासाभरात पलटून गेला. आपण ज्या जागी असू तिथलं आपलं आयुष्य वेगळंच असतं. अमेरिकेतील माझं जीवन जगून दाम्पत्य परतीच्या प्रवासाला निघाले! त्यांनी कल्पना करायला शिकवलं, त्यांना त्याच्या पलीकडची दुनिया दाखवण्यात जे समाधान आहे, ते सांगायची ताकद माझ्या शब्दात तरी नाही!

या प्रवासाने मला एक गोष्ट मात्र शिकवली — आपण कितीही मोठे झालो तरी आई-बाबांसोबत असताना पुन्हा लहानच होतो. आता त्यांच्या आनंदात आपला आनंद दडलेला असतो. थोरल्यांच्या उन्हाळी सहलीच्या आठवणीत, एकच ओळ ध्यानात येते: "पायाखालची जमीन बदलू शकते, पण डोक्यावर हात फक्त त्यांचाच असतो!"